Thursday, 6 February 2020

यह आदमी किस मिट्टी का बना है? (श्री नरेंद्र मोदी) ❤️सव्वाशे कोटी लोकसंख्येचा देश नुसता राखायचा म्हटलं तरी ते सोपं काम नाही. प्रत्येक राज्य वेगळं, तिथले प्रश्न वेगळे, नैसर्गिक-भौगोलिक समस्या वेगळ्या, तिथल्या नागरिकांच्या गरजा वेगळ्या.. प्रत्येक राज्यनिहाय ही अशी यादी करायची म्हटली तरी आपलं डोकं हलेल, अशी स्थिती. त्यात पुन्हा विरोधकांनी तोफा डागायला केलेली सुरूवात आणि दररोज एक नवा विषय काढून माजवलेलं रणकंदन...! ह्या सगळ्या जंजाळात नुसतं टिकून राहिलं तरी खूप झालं असतं..!

आपणच जरा विचार करून पाहू. आपल्या परिचयातली किंवा नात्यातली व्यक्ती, आपला मित्र-मैत्रिण किंवा आॅफिसमधला सहकारी आपल्याविषयी एखादा शब्द बोलला तर आपल्याला त्याला सणसणीत प्रत्युत्तर दिल्याशिवाय झोप लागत नाही, चैन पडत नाही. आपण अस्वस्थ होतो, संतापानं पेटून उठतो. ती व्यक्ती समोर आली तर आपल्या हातून त्याच्या गालावर चार बोटं उठतीलही.. आणि कुणीही ह्या प्रतिक्रियेला ‘अगदी स्वाभाविकच आहे हे’ असंच म्हणतील.

रस्त्यावरच्या कोण कुठल्या अनोळखी व्यक्तीनं आपल्या वाटेत गाडी जरी आडवी घातली तरी आपल्या तोंडून चार उच्च दर्जाच्या शिव्या हासडल्या जातातच. हाॅटेलातल्या वेटरनं आणलेल्या फिंगर बाऊलमधलं पाणी जरासं कोमट असलं तर त्याची काॅलर धरण्यापर्यंत आपली मजल जाते. ज्येष्ठ अभिनेते निळू फुले, चंदू पारखी यांच्या पडद्यावरच्या व्यक्तिरेखा पाहून खऱ्या जगात नागरिकांनी त्यांना हातापायांनी प्रसाद दिल्याचीही उदाहरणं आहेत. मनुष्यप्राणी मुळातच अतिसंवेदनशील.. क्षुल्लक गोष्टीवरून एखाद्याच्या संपूर्ण घराण्याचा उद्धार करायलाही आपण मागेपुढे पाहत नाही.

पण कुणीही उठावं अन् चारचौघांत अत्यंत घाणेरड्या शिव्या द्याव्यात, आयाबहिणींवरून शिव्या द्याव्यात, बायकोवरून-वैवाहिक जीवनावरून शिव्या द्याव्यात, पार पुरूषत्वावरूनही शिव्या द्याव्यात, हा प्रकार एक व्यक्ती अत्यंत शांत चित्तानं पाहत होती. कोण होती ही व्यक्ती? सार्वभौम भारताचे लोकनिर्वाचित पंतप्रधान श्रीमान नरेंद्र दामोदरदास मोदी..!

लोक बेजबाबदार म्हणत होते, _नीच_ म्हणत होते, चोर म्हणत होते, सैनिकांच्या प्राणांचा सौदा करणारा माणूस असं म्हणत होते, आरएसएस चा कुत्रा म्हणत होते, बेफिकीर, बेशरम, फुटाणा म्हणत होते, अश्लील शिव्यांना तर काही सुमारच नव्हता आणि भारताचे माननीय पंतप्रधान हे सर्व सहन करत होते.

पत्रकारांची गोष्ट तर काय वर्णावी? ऐरावताला कशी दहा तोंडं असतात, तशा पत्रकारांना दहा जिभा फुटलेल्या होत्या. काही पत्रकार त्यांची अक्कल काढत होते, काही त्यांची लायकी काढत होते, काही त्यांच्या चारित्र्यावर तोंडसुख घेत होते. त्यांना शिव्याशाप देणाऱ्या आणि त्यांची निंदानालस्ती करणाऱ्या व्यक्तींना वृत्त वाहिन्यांचे संपादक “विचारवंत, राजकीय विश्लेषक, ज्येष्ठ पत्रकार, अभ्यासक” अशी बिरूदं लावत होते. त्यांना चर्चेत बोलण्यासाठी स्वतंत्र वेळ दिला जात होता, त्यांचं बोलणं मध्येच तोडलं जात नव्हतं. हे सगळं प्रकरण संपूर्ण देश रोज पाहत होता.

हे सगळं कमी पडलं म्हणून की काय, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, माजी सनदी अधिकारी, नामवंत साहित्यिक, कलावंत, अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक ही फौजही यात सामील झाली. प्रसारमाध्यमांसमोर बोलत होतेच, पण त्यानं काहीच होईना म्हणून मग पुरस्कार परत करण्याचे प्रकार सुरू झाले. त्यानंही काही होईना. मग ‘आम्हाला या देशात राहण्याची भीती वाटते, असुरक्षित वाटतं’ असंही म्हणून झालं. हे एखाद्या सामान्य माणसानं केलं असतं तर त्याला कुणी हिंग लावूनही विचारलं नसतं. पण ही तर सेलिब्रिटी माणसं..! देशातली लोकप्रिय व्यक्तिमत्त्वं..! त्यांना पुढं करून अस्वस्थता निर्माण करण्याची एकही संधी माध्यमांनी सोडली नाही. पण तेही अस्त्र निष्फळ ठरलं. “मोदी पंतप्रधान झाले तर आम्ही हा देश सोडून जाऊ” हेही म्हणून झालं. निवडणुका तोंडावर आल्यावर तर यांनी ‘मोदींना मत देऊ नका’ असं जाहीर आवाहन करून सह्यांची मोहीम उघडली.

आपण त्यांच्या जागी जरा स्वत:ला ठेवून पाहू आणि स्वत:लाच प्रश्न विचारू की, ‘त्यांच्या जागी मी असतो तर मला त्यांच्याइतकं शांत राहणं जमलं असतं का?’ आपल्या कुटुंबियांपैकी कुणाचा असा अपमान झाला तर सगळे नातेवाईक एकत्र येतात आणि त्या विवक्षित व्यक्तीचे हातपाय तोडायला पण मागेपुढे पाहत नाहीत. पण इथे तर पंतप्रधानांच्या एकाही नातेवाईकानेही तक्रार केली नाही.

एका देशाचा पंतप्रधान मनात आणेल तर काय करू शकणार नाही? त्यांना काय अशक्य आहे? संपूर्ण राष्ट्रीय यंत्रणा कामाला लावून एकेकाला पकडून त्याचे वाटेल ते हाल करू शकले असते. आयुष्यातून,सामाजिक जीवनातून कायमचं उठवू शकले असते. आणि ह्याविषयी इतकी गोपनीयता बाळगली गेली असती की, वाहत्या वाऱ्यालाही याचा पत्ता लागला नसता. हातात सत्ता असूनही इतका संयम आणि स्थिरबुद्धी यांच्यात आली कशी? हा प्रश्न एक मानसतज्ज्ञ म्हणून पडणं अगदी स्वाभाविक होतं.

व्यक्तिगत किंवा खाजगी जीवनातील घटनांचा प्रचंड विपर्यास करून प्रतिमा हनन करण्याचा प्रयत्न पाच वर्षं सुरू होता. त्यांच्या राहणीमानापासून ते त्यांच्या संपत्तीपर्यंत एकही गोष्ट अशी नसेल, ज्यावर टीका झाली नाही. “एक चहावाला देश काय सांभाळणार?” इथपासून सुरू झालेली आगपाखड “ज्याला स्वत:ची बायको सांभाळता आली नाही तो देश काय सांभाळणार?” इथपर्यंत घसरली. एअरस्ट्राईक संदर्भातही “मी स्वत:च एक विमान चालवत होतो असंही मोदी म्हणतील” अशीही चेष्टा झाली. पण, हा माणूस शांत राहिला, हेच अभ्यासण्या सारखं आहे.

एकेरीत उल्लेख होऊन टीकेचा धनी होण्याचा प्रसंग मोदींवर वारंवार आला. विरोधी पक्षांनी त्यांना तोंडदेखली सन्मानजनक वागणूक देखील दिली नाही. एखाद्या व्यक्तीनं चारचौघात आपल्याला ओळख दाखवली नाही किंवा ती व्यक्ती आपल्याशी नीट बोलली नाही तर आपला किती तिळपापड होतो? मग पंतप्रधानांचा झाला नसेल का?

आपल्याला आपले स्वत:चे, आपल्या कुटुंबियांचे, आपल्या जातीचे, धर्माचे, संबंधित संघटनांचे, राजकीय पक्षांचे कडवे स्वाभिमान असतात, आहेत. पराकोटीचे इगो असतात, आहेत. कुणीतरी लिहिलेल्या एका वाक्यावरून किंवा कुणीतरी केलेल्या एका वक्तव्यावरून आपण सामान्य माणूस असूनही जर हातात दगड घेऊ शकतो, जर समोरच्यावर हात उचलू शकतो, जर सरकारी मालमत्तेचं नुकसान करू शकतो, तर मग देशाच्या पंतप्रधानांनी तर काय काय करायला हवं?

मोदींनी हिटलरगिरी केली असा आरोप अनेकजण करत होते, व्यक्ति स्वातंत्र्याची गळचेपी झाली अशीही ओरड होत होती. पण अगदी शब्दश:च सांगायचं झालं तर, गेली पाच वर्षं जे नित्यनेमानं त्यांना शिव्यांची लाखोली वाहत होते, त्यांच्या केसालाही धक्का लागलेला नाही आणि त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरही निर्बंध आले नाहीत. सगळेजण मोदींवर टीका करण्याचा आनंद अगदी मनसोक्त लुटत राहिले.

ज्यांना राजकारण म्हणजे काय आणि ते कशाशी खातात हे माहीतही नाही, तेही मोदींचे केवळ विरोधकच नव्हे तर शत्रू बनले. ज्यांना स्वत:च्या जिल्ह्याचा नकाशा नीट माहीत नाही, ती माणसं पुलवामा-बालाकोट वर बोलायला लागली. दिवसाला मिळालेला इंटरनेट डेटा केवळ मोदी-शहांना शिव्या देण्यापोटीच खर्च करणारेही अनेकजण होते. माझ्या सारख्याला हे समजलंच नाही की, मोदींच्या कट्टर विरोधात जावं असं या सामान्य माणसांना का वाटलं?

फेसबुकवरच्या वृत्तवाहिन्यांच्या पेजवरच्या कमेंट्स मी उत्सुकतेने वाचत असे. त्यातले बहुतांश मोदीविरोधक खोट्या नावांनी अकाऊंट्स काढून शिवीगाळ करतात, हे लक्षात आलं. काॅलेजात शिकणारे विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी चळवळीतील कार्यकर्ते यांचे स्वतंत्र फेसबुक ग्रुप सुरू झाले. त्या ग्रुपचं नाव निराळंच आणि आतमध्ये मोदी-शहांना नुसत्या शिव्याच..! काॅलेजात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचं किंवा शाळाशिक्षकांचं मोदीजींनी काय वाकडं केलं, हे कुणालाच माहित नाही. पण *संपूर्ण देश मोदी विरोधात आहे असा आभास यशस्वीपणे निर्माण केला गेला. एकूण काय तर, चहापेक्षा किटली गरम...!
पण, स्वत:चं काम, किंवा दैनंदिन कार्यक्रम यांमध्ये तसूभरही विचलित न होता पंतप्रधान स्वत:चं काम करत राहिले. पाच वर्षांत त्यांनी एकदाही सुट्टी घेतली नाही आणि विशेष म्हणजे ते एकदाही आजारी पडले नाहीत. व्यक्तिगत टीकेकडे त्यांनी पूर्ण दुर्लक्ष केलं आणि ते अतिशय शांत राहिले.

त्यांच्या स्थिरबुद्धीला आणि शांततेला तडाच जात नाही, हे पाहून त्यांचे विरोधकच अधिक अस्वस्थ होत गेले. ‘आम्ही राजकारण सोडून देऊ’ इथपासून ते ‘मोदी पंतप्रधान झाले तर आत्महत्या करू’ इथपर्यंत वक्तव्यं करून झाली. ( "मला बंदूक आणून दिली तर मी मोदींना ठार करीन!" किंवा मोदी निवडून आले तर"मी आत्मत्याग करेन," "मी सदरा घालणार नाही!" वगैरे...) पण कशाचाही परिणाम ह्या चिरेबंदी व्यक्तिमत्वावर झाला नाही. साधा ओरखडाही उठला नाही. त्यामुळेच, समोरच्या व्यक्ती अधिक अस्वस्थ होत गेल्या आणि त्यांना त्यांच्या ध्येयधोरणांचे, उद्दिष्टांचे, राजकीय भूमिकांचे भानच उरले नाही. यालाच ‘संदीग्धता’ असं म्हणता येईल.

अनेक खुसपटं मुद्दाम उकरून काढण्यात आली, त्यांच्या वक्तव्यांचा मोठ्या प्रमाणात विपर्यास करण्यात आला. देशभर टीकेच्या झोडी उठवण्यात आल्या. ह्याचा किती मानसिक ताण त्यांच्यावर आला असेल? आॅफिसमधला एक माणूस आपल्याला सहकार्य करत नसेल तर माणसं सरळ राजीनामा देऊन मोकळी होतात. ह्या व्यक्तीनं पाच वर्षं कसं काम केलं असेल?

ह्या पाच वर्षांत आपण आपला काहीही संबंध नसताना देशाच्या नेतृत्वावर विनाकारणच नकारात्मक तणाव निर्माण करत राहिलो, ह्याची कणभरही जाणीव लोकांना नाही. अतिरिक्त मानसिक तणाव व्यक्तीच्या कार्यक्षमतेची आणि निर्णयक्षमतेची अतोनात हानी करतो. माणसं सैरभैर होतात, त्यांच्या हातून चुका घडायला लागतात. पण, २०१४ मध्ये ज्यांनी मोदींच्या नेतृत्वाला मतपेटीद्वारे पसंती दिली, त्यांना हे नक्कीच कळून चुकलं असेल की, त्यांनी एका अत्यंत कणखर, सक्षम आणि चारित्र्यवान व्यक्तीची निवड केली आहे आणि ती निवड योग्यच आहे.

ते शांत राहिले, गंभीरपणे-प्रामाणिकपणे काम करत राहिले आणि त्यांचा मार्ग आक्रमत राहिले. मॅस्लोच्या मांडणीनुसार, आत्मवास्तविकीकरणाच्या स्तरावर मा.पंतप्रधान कधीच पोचलेले आहेत. मी कोण आहे, माझं ध्येय काय आहे, मी ह्या पदावर कशाकरिता आहे, माझं कर्तव्य काय आहे, या क्षणी माझी भूमिका काय असली पाहिजे, माझी देहबोली कशी असली पाहिजे, मी नेमक्या कोणत्या गोष्टींना प्राधान्य दिलं पाहिजे ह्या *सर्व प्रश्नांची स्पष्ट उत्तरं त्यांच्याकडे असल्या शिवाय इतकं शांत राहणं शक्यच नाही.

सत्ता, पैसा, राजपद, सुखोपभोग, विलास यापैकी कशाचाही मोह असला असता तर त्यांनी चवताळून उत्तरं दिली असती, विरोधकांवर धावून गेले असते, पत्रकारांना अपमानास्पद वागणूक दिली असती. पण यातलं काहीच घडलं नाही. उतावीळपणे किंवा संतापाच्या भरात त्यांनी कुठलंच पाऊल उचललं नाही. त्यांचं भावनिक नियंत्रण किती उच्च दर्जाचं असेल, याची आपण कल्पना करू शकू.

राजकीय जीवनात राहूनही त्यांनी स्वत्व आणि स्वाभिमान सोडला तर नाहीच, शिवाय देशावर त्याची सक्तीही केली नाही. ‘माझा विरोध करणाऱ्यांना घरात घुसून मारा’ असली आक्रमक हिंसक आवाहनं त्यांनी कधीही केली नाहीत. पंतप्रधान पदाला अशोभनीय ठरेल असं वर्तन त्यांनी कधीही केलं नाही. विखारी वक्तव्यांपासून ते दूर राहिले. मतांसाठी त्यांनी स्वत:च्या श्रद्धांशी प्रतारणा केली नाही. विरोधकांच्या टीकास्त्रांना ते कृतीतून उत्तर देत राहिले.

परंतु, दुसऱ्या टोकाला शालेय विद्यार्थ्यांशी ते संवाद साधत राहिले, विविध क्षेत्रातील कल्पक आणि कर्तृत्ववान मान्यवरांशी ते चर्चा करत राहिले, उत्तम आणि अभ्यासू श्रोता बनून नवनवी माहिती ते घेत राहिले. समाजोपयोगी कार्य सेवाभावानं करणाऱ्या व्यक्तींना ते देशापुढे आणत राहिले. विविध तज्ञांच्या कामात राजकीय इच्छाशक्ती हा अडसर बनू न देता, त्यांनी त्यांना उन्मुक्त संधी दिल्या. देशाच्या कर्तृत्वाची प्रेरणा ते सतत फुलवत राहिले.

आपण त्यांचे डोळे पहावेत. ते एका निराळ्याच तेजानं चमकत असतात. समोरच्याच्या नजरेला नजर भिडवून संवाद साधण्याची त्यांना सवय आहे. त्यांचं शांतपणानं पण दमदार पावलं टाकत चालणं पहा. प्रत्येक पाऊल पूर्ण विचारांतीच टाकण्याचा आत्मविश्वास त्यातून दिसून येईल. त्यांची बोलण्याची पद्धत किंवा संवादांची फेक पहा. ते अतिशय संयमानं पण ठामपणानं त्यांची मतं मांडतात. ‘मला असं बोलायचं नव्हतं, माझा असा हेतू नव्हता’ अशी सारवासारव करण्याची वेळ त्यांच्यावर आलेली नाही, त्याचं कारण तेच आहे.

आता उरला शेवटचा मुद्दा. तो म्हणजे 'सत्तातुराणां न भयं न लज्जा' असं एक संस्कृत वचन आहे. (ज्यांना ते उच्चारणं जमत नसेल त्यांनी उगाच चावटपणा करून संस्कृतविषयक ज्ञानाचा जाहीर प्रयोग करण्याच्या भानगडीत मुळीच पडू नये. मागे अशाच प्रयत्नांत अनेकांची फसगत झालेली आहे.) ‘सत्तेकरिता हपापलेल्यांना ना भीती, ना लाज’ असा त्या वचनाचा अर्थ. पण ह्या उक्तीमध्ये मा. पंतप्रधान मुळीच बसत नाहीत. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर यांपासून ते गेली अनेक वर्षे लांबच आहेत. त्यामुळे, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा मूळ पायाच प्रखर राष्ट्रविचार, नैतिकता आणि विवेक ह्यांच्या रसातच घातला गेला आहे.

आता असे प्रधानमंत्री लाभल्याबद्दल आनंद, समाधान व्यक्त करायचं, की सकाळ-संध्याकाळ बोटं मोडत बसायचं, हे प्रत्येकानं आपापलं ठरवावं!

।। जय हिंद ।।
।। जय भारत ।।


Share on Whatsapp
 1. Great information,Thank you very much for the Great Content Sir, I will also share with my friends,Once again Thank you !
  Dofollow Back links
  Dofollow Back links
  Dofollow Back links
  Government Jobs
  Dofollow Back links

  ReplyDelete

Please do not enter any spam links in the comment box.

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search